मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. अशात आता मनेसचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राजू पाटील आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, “बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?” असा प्रश्न राजू पाटील यानी विचारला आहे.
बंड झाले,आता थंड झाले ?
पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.