‘खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे’ राणेंचं सूचक ट्विट

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र आ.नितेश राणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. राणे पिता-पुत्र आज मालवणी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. मात्र, त्यापूर्वी आ. नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी म्हटलं, “खेल आपने सुरू किया, खत्म हम करेंगे, न्याय मिलेगा”. सुरुवात तुम्ही केली आहे आणि शेवट आम्ही करू, न्याय मिळणार असं ट्विट करत नितेश राणेंनी एक सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आ. नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळे आज जबाब नोंदवल्यानंतरही राणे पिता-पुत्रांना अटकेची भीती नाही. राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईतील मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती. दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share