ऐश्वर्याने नाकारली होती भूलभूलैय्यातील ‘मंजुलिका’ ची ऑफर….

अनीझ बझमीनं दिग्दर्शित केलेला ‘भूलभूलैय्या २’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तब्बू देखील या सिनेमात सहकलाकाराच्या भूमिकेत आहे. या सिनेमात अक्षय कुमारला कार्तिकनं रीप्लेस केलं आहे. मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालनला कियारानं रीप्लेस केलं आहे. तर अमिषा पटेलच्या व्यक्तिेखेला तब्बू साकारणार आहे. २००७ मध्ये आलेल्या हॉरर कॉमेडी सिनेमा भूलभूलैय्याचा हा सीक्वेल आहे. सुरुवातीला हा सिनेमा ३१ जुलै,२०२० रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे सिनेमाचं प्रदर्शन अनेकदा पुढे ढकललं गेलं. आता हा सिनेमा २० मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चला,आता हे झालं आताच्या भूलभूलैय्या २ सिनेमाविषयी,पण आता जाणून घेऊया महत्त्वाची गोष्ट जी कदाचित अनेकांना माहित नसेल.
2007 मध्ये आलेल्या ‘भूलभूलैय्या’ सिनेमात अक्षय कुमारनं डॉ.आदित्य श्रीवास्तव आणि विद्या बालननं अवनीची भूमिका साकारलेली होती. त्याचबरोबर शाइनी अहूजा,अमिषा पटेल,परेश रावल, मनोज जोशी,विक्रम गोखले,राजपाल यादव असे कलाकार सहकलाकारांच्या भूमिकेत होते. हा सिनेमा १९९३ मध्ये आलेल्या मल्याळम सिनेमाचा रीमेक होता. ज्या सिनेमाचं हिंदीत प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन केलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का या सिनेमात विद्या बालन ऐवजी ऐश्वर्या रॉय आणि राणी मुखर्जीला मंजुलिकाची भूमिका ऑफर केली होती.


फिल्म मेकर्सनी मंजुलिकासाठी ऐश्वर्या रायची निवड केली होती. ती या भूमिकेसाठी दिग्दर्शकापासून सर्वांची पहिली पसंती होती. पण ऐश्वर्यानं भूताशी संबंधित भूमिका साकारणार नाही असं सांगून सिनेमाला नकार कळवला होता. त्यानंतर ही भूमिका राणी मुखर्जीला ऑफर केली गेली. पण तिनं देखील नाही म्हटलं. आणि शेवटी निर्मात्यांनी विद्या बालनला स्टोरी ऐकवली आणि तिनं एकदाचा होकार दिला.

बोललं जातंय की ,अमिषा पटेलनं साकारलेली राधाची भूमिका कतरिना कैफला ऑफर केली गेली होती. त्यावेळी अक्षय-कतरिनाचे काही इतर सिनेमे आले होते आणि त्यातनं या जोडीला पसंत केलं गेलं होतं. म्हणून निर्माते-दिग्दर्शकांना कतरिना हवी होती भूलभूलैय्यात. पण कतरिनानं नकार दिला. मग त्यानंतर ही भूमिका अमिषाला ऑफर केली गेली अन् तिनं खूप छान पद्धतीनं ती राधा साकारली. आणि तिचं त्या भूमिकेसाठी कौतूकही केलं गेलं. तर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूलभूलैय्या’ सिनेमात विद्या बालननं साकारलेल्या मंजुलिका भूमिकेला खूप नावाजलं गेलं होतं.

Share