काबुल : अफगाणिस्तानची राजधानी आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरली. राजधानी काबूल येथील एका माध्यमिक शाळेत मंगळवारी (१९ एप्रिल) आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काबुल पश्चिमेच्या भागातील शाळेमध्ये आज सकाळी बॉम्बस्फोट करण्यात आले. पहिला बॉम्बस्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला, तर दुसरा बॉम्बस्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. आत्मघातकी हल्लेखोराने शाळेमध्ये स्वत:ला उडवून दिले. यावेळी मुले शाळेबाहेर उभी होती. या घटनेत २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्कूल बसद्वारे शाळेतून बाहेर पडत असताना बॉम्बस्फोट करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येने राहत असलेल्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे. इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर हजारा समुदाय आहे, अशी माहिती आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर देशाला सुरक्षित केले असल्याचा दावा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांनी इस्लामिक स्टेटसकडून हल्ले वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रिय झाले आहे. दहशतवादी संघटना शिया समुदायाला निशाणा बनवत आहे. शिया मुस्लिम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातील काबुलमधील एका मोठ्या मशिदीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. नमाज सुरू असतानाच झालेल्या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एका संशयिताला अटक करण्यात आली होती.