भारतासाठी ऐतिहासिक क्षण! अंतराळात झेपावले शुभांशू शुक्ला; काय आहे एक्सियम-4 मोहीम ?

भारतासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आज अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले होते. शुभांशु शुक्ला आज म्हणजेच बुधवार 25 जून रोजी एक्सिओम-4 या मिशन अंतर्गत अंतराळात झेपावले आहेत. ते या मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान अर्थात ‘आयएसएस’मध्ये (International Space Station) गेले आहेत. शुभांशू शुक्ला ‘आयएसएस’ चा दौरा करणारे पहिले भारतीय तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार 25 जून रोजी दुपारी एक्सियम-4 अवकाशात झेपावले आहे. आता अवघ्या भारतीयांचं लक्ष या मिशनकडे लागलं आहे.

एक्सिओम-4 या मिशन अंतर्गत शुभांशू शुक्ला 14 दिवस अंतराळात राहणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीर या मिशनसाठी पाठवले गेले आहेत. हे अंतराळवीर भारतासोबतच अमेरिका, हंगेरी आणि पोलंडचे रहिवासी आहेत. यापूर्वी अनेकदा ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. रॉकेटमध्ये आढळलेल्या तांत्रिक त्रुटी आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये झालेल्या गळतीसारख्या समस्यांमुळे हे मिशन थांबवण्यात आले होते. आता सगळ्या समस्या दूर झाल्या असून हे अंतराळवीर आज अखेर अंतराळात झेपावले आहेत.

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण याआधी राकेश शर्मा 1984 साली रशियन मोहिमेअंतर्गत अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते. विशेष म्हणजे, तेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा जन्मदेखील झालेला नव्हता. त्यानंतर आता 41 वर्षांनी शुभांशू अंतराळात गेले आहेत. एक्सिओम-4 हे एक कमर्शियल मिशन आहे. एक्सियम स्पेस नावाची अमेरिकन कंपनी, नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे मिशन पार पाडलं जाणार आहे.

कोण आहेत शुभांशू शुक्ला?

शुभांशु शुक्ला यांचा जन्म 1985 साली उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथे झाला. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 MKI, मिग-21S, मिग-29 S, जॅग्वार, हॉक्स डॉर्नियर्स आणि N-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे. अमेरिकेची नासा (NASA)आणि भारताची इस्रो (ISRO) या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. शिवाय भारताची स्वत:ची पहिली गगनयान या मानवी अंतराळ मोहीमेमध्ये एका भारतीय व्यक्तीला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरीकोटा स्टेशनमधून अंतराळात पाठवलं जाईल. त्यासाठी चार जणांची निवड झाली आहे. त्यातही शुभांशू शुक्ला यांचं नाव आघाडीवर आहे.

Shubhanshu Shukla

काय आहे एक्सियम-4 मिशन?

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे एक्सियम-4 मिशनचे पायलट असतील. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून ही मोहीम झेपावेल. एक्सियम-4 14 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. आता शुभांशु शुक्ला यांना सगळे शुभेच्छा देत असून सगळ्या भारतीयांचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.

Share