भावा-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच ‘भाऊबीज’

दिवाळीतील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते. द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो`, अशी यामागची भावना आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरिता हा भाऊबीजेच्या सण. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिन. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात `ओवाळणी` देऊन बहिणीचा सत्कार करतो. जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी `वसूल` केली जात नाही तर, बहीणही भावाला आणि वहिनीलाही भेटवस्तू देत असते.

भाऊबीजेची कथा
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात, यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

भाऊबीज 2021

भाऊबीज सण साजरा करण्याची पद्धत
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. जेवणात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.

Share