महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. विरोधी पक्षांनी मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच लावून धरत सरकारच्या त्रिभाषा सुत्रीला विरोध केला, त्यानंतर सरकारनं हे धोरण मागेही घेतलं आहे. पण अजूनही हा वाद थांबायला तयार नाही. या बाबत अनेकांनी आपली मत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता या भाषिक वादावर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी भाषेच्या वादावर बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, “मी सध्या वर्तमानपत्रात वाचतो आहे की, तुम्ही मराठीत बोलला नाहीत तर तु्म्हाला मार खावा लागेल. तमिळनाडूतही हेच घडलं आहे. मी तिथे खासदार असताना, एके दिवशी मी काही लोकांना एकाला मारहाण करताना पाहिले… जेव्हा मी त्यांना कारण विचारलं तेव्हा ते हिंदीत बोलत होते. मग, हॉटेल मालकाने मला सांगितले की ते लोक तमिळ बोलण्यासाठी त्यांना मारहाण करत आहेत… जर आपण अशा प्रकारचा द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल… दीर्घकाळासाठी आपण महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत… मला हिंदी समजत नाही, आणि तो माझ्यासाठी एक अडथळा आहे… आपण जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे…”, असं मत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मांडलं आहे. याशिवाय मला जर मराठी बोलता आलं नाही म्हणून कोणी मारहाण केली तर मला लगेच मराठी बोलता येईल का?” असा सवालही त्यांनी केला आहे.
सीपी राधाकृष्णन यांच्या या विधानावर आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी, “राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणे हे योग्य नाही कारण ते राज्यपाल आहेत. राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहेत का? राज्यपालांसमोर खूप मोठे मोठे विषय आहेत. मंत्री जे राज्यभर फिरत आहेत, एक मंत्री बुक्का मारत आहे तर एक मंत्री बनियन घालून बसले आहेत. हे सगळं लक्षात घेता आणि पाहता त्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.