राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

अकोला : राष्ट्रवादीचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासमवेत १२० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बळीराम सिरस्कार यांनी मुंबईत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ ऑगस्ट रोजी भेट घेतली. त्यानंतर आज त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार आकाश पुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार वंसत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अकोला शहरातील डॉ. सुशिलाबाई देशमुख महाविद्यालयात हां प्रवेश सोहळा पार पडला.

बळीराम सिरस्कार यांचा राजकीय प्रवास
बळीराम सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सलग १० वर्ष आमदार राहिले आहेत. सिरस्कार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या तीन वर्षात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे ते अस्वस्थ होते.

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे काहीतरी पदरात पडणार, या आशेवर असलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांची आशा सत्ता गेल्यामुळे मावळली. त्यामुळे त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share