महापरिनिर्वाण दिनानिमित्त १० विशेष रेल्वे गाड्या

नागपुर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत ३ विशेष गाड्या धावतील. ६ विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम / अजनी / नागपूर आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत राहील, विशेष गाड्यांचा तपशील असा आहे. विशेष गाडी क्रमांक ०२२६२ नागपूरहून ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

०१२६६ क्रमांकाची विशेष रेल्वे गाडी ५ डिसेंबरला दुपारी ३.५० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

येथे राहणार थांबे
या विशेष रेल्वे गाड्यांचे अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबे राहतील.

मुंबईहून येणाऱ्या गाड्या
विशेष गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबरला सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबरला सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर येथून ६ डिसेंबरला मध्यरात्री सुटेल आणि ७ डिसेंबरला दुपारी ३.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०५ वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक १२५९ दादर येथून ७ डिसेंबरच्या मध्यरात्री सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

Share