महाविकास आघाडीत काँग्रेसचे २५ आमदार नाराज, सोनिया गांधींची भेट घेणार

मुंबई- गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही आमदारांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आता काँग्रेस पक्षामधून देखील नाराजीचा सूर उमटला  आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात असून यासंदर्भात थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसचे २५ आमदार थेट सोनिया गांधींना भेटणार आहेत. त्यासंदर्भातील वेळ देखील त्यांनी मागूण घेतला आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री आपल्या मागण्यांना दाद देत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये आमच्या मागण्यांना महत्व नाही. याबाबत सोनिया गांधींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी एका पत्राद्वारे केल्याची माहिती आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी निधी देत नाहीत, तर पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी कशी करणार? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

जेव्हा पासून महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली तेव्हाचं सोनिया गांधी यांनी शिष्ट मंडळाची स्थापना करुन वरिष्ट काँग्रेस नेत्यांना आमदारांची जबाबदारी दिली आहे याबद्दल देखील आमदारांना माहिती नसल्याचे एका आमदाराने स्पष्ट केले आहे. सरकारमधील आमदारांची नाराजी उघडपणे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार देखील निधी वाटपावरून नाराज आहेत. तसेच राष्ट्रवादीवर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. आता काँग्रेसच्या आमदारांची नाराजी समोर आली असून याबाबत काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी काय तोडगा काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share