औरंगाबादेत तलवारींचा मोठा साठा जप्त; क्रांतीचौक पोलीसांची कारवाई

औरंगाबाद : शहरात क्रांतीचौक पोलीसांनी कारवाई करीत तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. DTDC कुरीयर कंपनीवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 37 तलवारी आणि 1 कुकरी पोलीसांनी हस्तगत केली आहे.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, क्रांतीचौक पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरात शस्त्रांचा मोठा साठा दाखल झाला आहे.  त्यानुसार क्रांतीचोक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक विकास खटके आणि प्रभाकर सोनावणे यांनी DTDC कूरियर कंपनीवर छापा मारला. यावेळी तब्बल ३७ तलवारी आणि १ कुकरी असे शस्त्र त्यांना आढळले. त्यांनी तात्काळ हे शस्त्र जप्त करून याची माहिती वरिष्ठाना दिली. याप्रकरणी आणखी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच याचा सविस्तर तपास आणखी सुरु आहे. पोलीस पुढील कारवाई करीत असल्याचं पोलीस उपायुक्त उज्वला वनकर यांनी सांगितल आहे.

दरम्यान, ऐन सणासुदीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा शहरात कोणी मागविला?  ते मागविण्याचे कारण काय? याचा शोध घेणे हे पोलीसांपुढचे मोठे आव्हान आहे.

Share