दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे

मुंबई : राज्य सरकारने काल मंत्री मंडळ बैठकीत राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय घेतला. निर्णयाचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. मात्र, आता कच खाऊ नका. या निर्णयाची अंमलबजावणी नीट करा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे. हे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1481525385343172614?s=20

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटले?
या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु, २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत, असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा.

आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड राज्य सरकारनं करुन ठेवली आहे की मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका.

राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापने देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Share