मुंबई : सन २०२४ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ २०२२-२३ अभियानातील ५ लाख घरे पुढील १०० दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधील जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू असा विश्वास राज्याचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ चा राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
सर्वांना घरे मिळावी यासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. यासाठी सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील राहवे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेंकाच्या हातात घालून काम करतात, तेव्हा राज्याचा विकास वेगाने होत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित #अमृतमहाआवास अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अति. मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते. pic.twitter.com/915Fqhw6es
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 24, 2022
बेघरमुक्त महाराष्ट्र करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण यामध्ये ग्रामीण विकास यंत्रणेने अतिशय चांगले काम केले आहे. अमृत महाआवास योजनेत मार्च २०२३ पर्यंत ५ लाख घरकुले बांधण्यात येतील. बेघर आणि गरजू लोकांच्या व्यतिरिक्त जे नागरिक महाआवास योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा नागरिकांना निकषात बसण्यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यातील बेघर व गरजूंना हक्काची घरे मिळावी यासाठी त्यांना जमिनी देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिलेली उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण केली जाणार आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे लाभार्थींना निधीचा पहिला हप्ता वेळेत दिला तर उर्वरित प्रकल्प जलदरित्या पूर्ण होईल. घरकुलांसाठी सध्या ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण मार्टच्या माध्यमातून घरकुलांसाठी साहित्य उपलब्ध होत असल्याने नवीन इको सिस्टीम तयार झाली असल्याने यातूनही मोठा रोजगार निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.