नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व खात्याने हरियाणा राज्यातील हिसार शहरात केलेल्या उत्खननामध्ये ५ हजार वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडले गेलेले हडप्पाकालीन शहर नुकतेच सापडले आहे. ५ हजार वर्षांपूर्वीची घरे, शहराची स्वच्छता, रस्ते, काही दागिने आणि व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे अवशेष तेथे आढळून आले आहेत. हे शहर हरियाणा राज्यातील हिसार परिसरातील राखीगढी गावाच्या ११ थरांमध्ये जमिनीत गाडले गेले असून, पुरातत्व खात्याच्या उत्खननामध्ये प्राचीन संस्कृतीचे अवशेष आढळल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
हडप्पा काळात गाडले गेलेले हे शहर सरस्वती नदीची उपनदी दृश्वद्वतीच्या किनाऱ्यावर वसले होते. जमिनीचा तिसरा थर खोदल्यानंतर या शहरातील स्वच्छतेपासून आणि रस्त्यांचा विकास कसा झाला होता, याचा अंदाज येतो. ५ हजार वर्षांपूर्वीची विटे, नाले आणि नाल्यांवरील मातीचे आवरण, या सगळ्यांमधून अनेक न सुटलेले शोधांचे रहस्य सापडण्याची चिन्हे आहेत.
भारतीय पुरातत्व विभागाचे संशोधक कुमार सौरव म्हणाले, “जेव्हा आज आपण पक्क्या विटांच्या गोष्टी करतो, त्या विटा हडप्पा काळातही होत्या. कारण, तत्कालीन ड्रेनेजवर त्या दिसतात. आपण लोकांना त्यावेळेच्या लोकांकडून स्वच्छतेचे धडे घेतले पाहिजेत. हडप्पाकालीन शहरातील ड्रेनेजची एक विकसित प्रणाली होती. तेव्हा नाल्यांवर मातीच्या हंड्यांसारखं आवरण झाकलं जायचं. जेणेकरून नाल्यात कचरा जाणार नाही.”
हिसार येथील राखीगढी गावाच्या जमिनीमध्ये कच्च्या आणि पक्क्या विटांपासून तयार केलेले रस्ते आणि घरांची संरचनादेखील सापडल्या आहेत. तिथे ५ हजार वर्षांपूर्वीची एक चूलदेखील मिळाली आहे. चुलीसंदर्भात कुमार सौरव म्हणाले, “ही एक आकर्षक बाब आहे की, चुलीला मडब्रिक लावून एक नवा प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला होता. इतकंच नाही त्यातून वाराही जाईल अशीही व्यवस्था होती. जेणेकरून चूल लवकर पेट घेईल; पण या चुलीवर जेवण तयार केले जात होते की, दुसऱ्या कामांसाठी त्याचा वापर केला जात होता, यावर संशोधर करावं लागेल.”