लातूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ते मार्ग निधीमधून लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे उदगीर ,जळकोट ,अहमदपूर ,शिरूर-अनंतपाळ ,देवणी आणि निलंगा तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करता येणार आहेत.विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यातल्या शेणकूड येथे असलेल्या नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे कामही पूर्ण करता येणार असल्याची माहिती लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली.
लातूर लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्या मागणीला लक्षात घेऊन रस्ते मार्ग निधी म्हणजेच सीआरएफ फंड मंजूर करण्यात आला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. @nitin_gadkari जी साहेबांना भेटून जास्तीत जास्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार CRF मधून 68 कोटी रु. निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे. pic.twitter.com/qO0D9DbsVL
— Sudhakar Shrangare (@mpsshrangare) December 15, 2022
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत, त्यांना निधीची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मंजूर करण्यात आलेल्या ६८ कोटी रुपयांच्या निधी मध्ये प्रामुख्याने चार रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. निटूर-शिरोळ -हेळंब- या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर उदगीर तालुक्यातल्या जानापुर ते शिरोळ या सीमावर्ती भागातील रस्त्यासाठी १८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातल्या हासरणी, सावरगावथोट, सोरगा,वडगाव,केकतसिंदगी या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी,काळेगाव,अहमदपूर,शिरूर-ताजबंद,उदगीर या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच निधीमधून अहमदपूर तालुक्यातल्या शेणकुड गावाजवळ असलेल्या नदीवरील पूलाचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या महामार्गांच्या कामा बरोबरच आता निधी मिळाल्याने राज्य रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. ६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आदेश काढत लातूर जिल्ह्यातल्या चार महत्वाच्या रस्त्यांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे म्हंटले आहे.