शहरातील उच्चभ्रु वसाहतीत चोरी; खिडकी तोडून घरात घुसले चोर, लाखोंचा माल लंपास

औरंगाबाद : शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या एन-१ भागात चोरी करत चोरट्यांनी ५० लाखांच्या आसपास दागिने आणि रोख रक्कम लंपास केले आहे. ही घटना काल दुपारी उघडकीस आली. परदेशात गेलेल्या डॉक्टर कुटुंबाच्या घरात ही चोरी झाली आहे. डॉ.संजय तोष्णीवाल यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते नेदरलॅंडला कुटुंबासोबत सहलीला गेले होते. चोरांनी बंगल्याच्या समोरील बाजूस असलेल्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलचे खिळे काढून आत प्रवेश करत ही चोरी केली. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर ही काढून नेला. डॉ.तोष्णीवाल यांच्या मते प्राथमिक अंदाजानुसार ५० लाखांच्या आसपास ही चोरी झाली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एन-१ येथील काळा गणपती मंदिराच्या मागील सोसायटीत डॉ. संजय तोष्णीवाल राहतात. नेदरलँडमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे ते कार्यक्रमानिमित्त गेले होते. २६ मे रोजी नेदरलँडला गेलेले ते ३१ मे रोजी भारतात आले. या दरम्यान त्यांच्या घरी झाडांना पाणी घालणारा येत होता. मात्र एक दिवस पाणी आले का, हे पाहण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांना खिडकी उघडी दिसली व त्यातून बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यांनी हा प्रकार तोष्णीवाल यांना कळवला. दुपारी दोन वाजता ते औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

 

Share