औरंगाबाद : ग्राहकांना नियमित आणि वेळेवर वीजबील भरण्याची सवय लागावी यासाठी महावितरणने एक खास बक्षीस योजना मराठवाड्यातील ग्राहकांसाठी आणली आहे. ‘वीज बिल भरा, बक्षीस मिळवा’ अशी ही योजना आहे. १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला १ हजार रुपयांपासून ते ई-स्कूटर, मोबाइल, फ्रिज आदी बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळेल.
महावितरण विकत वीज घेऊन ग्राहकांच्या घरापर्यंत पुरवठा करते. ग्राहक वापरलेल्या वीज बिलाचा नियमित भरणा करत नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत आहे. थकबाकीदार ग्राहकांची थकबाकीही वाढतच चालली आहे. त्यांच्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवली आहे. याचा कंपनी व ग्राहक अशा दोघांनाही मोठा फटका बसत आहे. यामध्ये सुधारणा व्हावी व येथून पुढे आणखी थकबाकीचा भार पडू नये, यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून महावितरणने नियमित वीज बिल भरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी बक्षीस योजना लागू केली आहे.
अशी जिंकता येईल बक्षीसे :
ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला सोडत होणार आहे. दर महिन्याला मराठवाड्यातील १०१ उपविभागांतून १ हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी २ बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. यासोबतच दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, ९ मंडळांतून प्रत्येकी एक मोबाइल हँडसेट किंवा टॅब्लेट, ३ परिमंडळांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस तर प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटर या दरमहा बंपर बक्षिसाचाही समावेश आहे.