शिर्डी : काॅँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीने नोटीस पाठवली आहे. तसेच ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ईडीने पाठवेल्या नोटिशीवरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटिस हा लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिर सुरु आहे. यावेळी थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून, संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर चालवला असून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनियाजीगांधी व खा.राहुलजी गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. देशातील जनता व आम्ही काँग्रेसजन सोनियाजी गांधी यांच्या पाठीशी आहोत. pic.twitter.com/KumOlI7EWc
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 1, 2022
काय आहे प्रकरण?
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती. गांधी कुटुंबीयांकडे ‘नॅशनल हेरॉल्ड’ ची मालकी असताना फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे या तक्रारीत म्हटले होते. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नावावर असल्यामुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.
इतर नेत्यांवरही आरोप
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. ‘यंग इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. ‘यंग इंडिया लिमिटेड’चा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे