बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणी सहा जणांना अटक

नांदेड : संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना अखेर यश आले आहे. बियाणी यांच्या हत्येच्या कटात कुख्यात दहशतवादी रिंदा ऊर्फ हरविंदरसिंग संधू याचा हात असल्याचा आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून बियाणी यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

बियाणी यांची हत्या झाल्याच्या दोन महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. ५५ दिवस २० पोलिस अधिकारी आणि ६० पोलिस कर्मचाऱ्यांनी संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करून सहा आरोपींना गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी नांदेड शहरातील आहेत. इंद्रपालसिंग ऊर्फ सनी सिंग मेजर (वय ३५), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५), सतनाम सिंग ऊर्फ दलबिर सिंग शेरगिल (वय २८), हरदीपसिंग ऊर्फ सोनू पिनिपाना सतनाम सिंग बाजवा (वय ३५), गुरूमुखसिंग ऊर्फ गुरी सेवकसिंग गील (वय २४) आणि करणजितसिंग रघबिरसिंग साहू (वय ३०, सर्व रा. नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ च्या सुमारास बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर राहत्या घराबाहेर मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात बियाणी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच बियाणी यांचा मृत्यू झाला. खंडणीच्या इराद्याने ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली होती.

संजय बियाणी यांच्या हत्येने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. बियाणी यांच्या हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणात नांदेडच्या विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बियाणी यांच्या हत्येचा सुगावा लागत नसल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशान्वये एसटीआयची स्थापना करण्यात आली होती. या एसआयटी पथकाच्या प्रमुखपदी भोकरचे सहायक पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची नेमणूक केली होती. या पथकात २० अधिकारी व ६० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बियाणी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सहा राज्यात पथके पाठवण्यात आली होती. विदेशातदेखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता.

एसआयटी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, डी.डी. भारती, संतोष शेकडे, शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, दशरथ खाडे, गंगाप्रसाद दळवी, पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश घोडके आदींनी या गुन्ह्याचा तपास केला. गुन्हे शाखा आणि विमानतळ पोलिस ठाणे यांच्यामार्फतही सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू होता.

सदर गुन्ह्याबाबत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जाऊन तपास करण्यात आला. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान आतापर्यंत वरील सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून तपासात आणखी काही धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share