पुण्यात मनसेला धक्का; वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

पुणे : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

निलेश माझीरे म्हणाले की, मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहाराध्यक्ष साईनाथ बाबार, मनसे नेते बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत, असं सांगत माझीरे यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. १९ मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्याय त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का? असं म्हणत हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केलाय.

मी याबाबत वसंत मोरेंना मेसेज केला आहे, पण त्यांनी तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा बोलावं, की याच्यावर अन्याय होतोय. मुळात मी वसंत मोरे समर्थक असल्याने माझं माथाडी कामगार सेनेच शहराध्यक्ष पद काढून घेतलं का? असा सवाल यावेळी माझिरे यांनी विचारला आहे. तर, मी कोअर कमिटीलाच नको होतो, असा घणाघात करत माझिरे यांनी मनसे सोडली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझीरे यांची ओळख आहे. पुणे मनसे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यपद त्यांच्याकडे होते. मात्र काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे आता पक्षाला रामराम केला आहे.

Share