घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची, महेश तपासेंची टीका

मुंबई :घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची भाजपची परंपरा आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी जाणीवपूर्वक सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा भाजपचा प्रयत्न असल्याचे महेश तपासे म्हणाले. महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमींवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची हॉटेलवारी सुरु आहे. राज्यसभेची निवडणूक तीन दिवसांवर आली असल्याने राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते आमदारांना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

Share