ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला न्यायालयाने झटका दिला आहे. केतकी चितळेने जामिनासाठी केलेला अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे.
वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी तिला जामीन मिळावा याकरिता तिने आज न्यायलात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता १६ जूनला सुनावणी होणार आहे. केतकीला १५ मे रोजी अटक झाली आहे. त्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान राज्यातील १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळेविरोधात वर्ष २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत केतकी चितळेला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी केतकीने न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे. त्यामुळे केतकीचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.