ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन कायम; अविश्वास ठराव जिंकला

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला
लंडन : वाढती महागाई आणि पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या डाउनिंग स्ट्रीट येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून पार्टीचे आयोजन केल्यामुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना दिलासा मिळाला आहे. ‘पार्टीगेट’ घोटाळ्यावरून  बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्याच सत्ताधारी हुजूर पक्षाने आणलेला अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवले आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थनासाठी २११ आणि विरोधात १४८ मते मिळाली. जॉन्सन यांनी ६३ मतांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. अविश्वास ठरावावर एकूण ३५९ मते नोंदवण्यात आली. यापैकी २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या डाउनिंग स्ट्रीट येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून जून २०२० मध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. लॉकडाउन काळात निर्बंध असतानाही बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत डाउनिंग स्ट्रीट येथे पार्टी केली होती. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याप्रकरणी जॉन्सन यांच्याच पक्षातील ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी कॅरी यांना डाउनिंग स्ट्रीटच्या कॅबिनेट रूममध्ये लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून पार्टी आयोजित केल्याप्रकरणी दंडही आकारण्यात आला होता. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून बेकायदा पार्टी आयोजित केल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांनी एप्रिलमध्येच माफी मागितली होती. मी कोणतेही नियम मोडले नाहीत. तसेच स्वतःच्या वाढदिवशी काही खास लोकांसोबत केक कापणे ही पार्टी नाही, असेही त्यांनी म्हटले होते

‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर प्रचंड दबाव होता. भारत दौऱ्यादरम्यानही हा दबाव कायम होता. पार्टीगेट घोटाळ्यावरून टीका होत असतानाच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या तब्बल ५४ खासदारांनी बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे विश्वासदर्शक ठरावाची १५ टक्के आवश्यकता पूर्ण झाली होती. यासोबत पंतप्रधान जॉन्सन यांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतदान घेण्यात आले. बोरिस जॉन्सन यांना आपल्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने पंतप्रधान काळातील सर्वात कठीण परीक्षेला सोमवारी सामोरे जावे लागले.

बोरिस जॉन्सन यांना अविश्वास ठराव जिंकण्यासाठी १८० खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. मतदानाआधी बोरिस जॉन्सन यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी बंडखोर १८० खासदारांची आवश्यकता होती. जॉन्सन यांच्याविरोधात फक्त ३२ मते कमी पडली. पंतप्रधान जॉन्सन यांच्याविरोधात मत देणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने हा बोरिस जॉन्सन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अविश्वास ठराव सादर झाल्यानंतर हुजूर पक्षातील ५८.६ टक्के खासदारांनी बोरिस जॉन्सन यांना समर्थन दिले आहे.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या तुलनेत कमी खासदारांचे समर्थन बोरिस जॉन्सन यांना लाभले. २०१८ मध्ये थेरेसा यांच्याविरोधातही अविश्वास ठराव आणण्यात आला होता. तेव्हा ब्रिटनच्या ६३ टक्के खासदारांनी समर्थन दिले होते. बोरिस जॉन्सन यांचा कार्यकाळ पुढील सहा महिन्यात संपुष्टात येणार आहे. अशातच त्यांनी विश्वास ठराव जिंकल्यामुळे ते सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान म्हणून कायम राहणार आहेत. हुजूर पक्षाच्या नियमांनुसार हा प्रस्ताव जिंकल्यानंतर किमान १२ महिने त्यांना पुन्हा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार नाही.

Share