वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाचे आदेश देणारे आणि या खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर न्यायाधीश दिवाकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून, हे धमकीचे पत्र नोंदणीकृत पोस्टाने इस्लामिक आगाज मूव्हमेंटच्या नावाने पाठवले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर लखनौ आणि वाराणसीमध्ये असलेल्या न्यायाधीशांच्या घराच्या सुरक्षेसाठी नऊ अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाराणसीच्या आयुक्तांनी कँट पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेला या पत्राची चौकशी करण्यास सांगितले आहे.
न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी सांगितले की, इस्लामिक आगाज मूव्हमेंट, नवी दिल्लीच्या नावाने एक नोंदणीकृत पत्र माझ्याकडे आले आहे. त्या पत्रात लिहिले आहे की, आता न्यायाधीशही भगव्यामध्ये रंगले आहेत. हिंदू आणि त्यांच्या सर्व संघटनांना खूश करण्यासाठी हा निकाल दिला आणि दुभंगलेल्या भारतातील मुस्लिमांवर याचे खापर फोडले. आजकाल न्यायिक अधिकारी वाऱ्याची दिशा बघून चालढकल करत आहेत. ज्ञानवापी मशीद संकुलाची तपासणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे, असे विधान तुम्ही केले आहे. तुम्ही पण मूर्तिपूजक आहात. तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल. मूर्तिपूजक हिंदू न्यायाधीशाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा मुस्लिम करू शकत नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.
न्यायाधीश दिवाकर यांनी ३० दिवसांपूर्वी व्यक्त केली होती चिंता
दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी ३० दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाबाबत निर्णय देताना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. या निर्णयात त्यांनी पुन्हा ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यात असे म्हटले होते की, कुलूप उघडून किंवा कुलूप तोडून सर्वेक्षण केले जात असेल तर त्यावर बंदी नको आहे. या निकालातच त्यांनी लिहिले होते की, सामान्य प्रकरण असाधारण करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भीती इतकी आहे की, माझ्या कुटुंबाला माझी आणि माझ्या कुटुंबाची सतत काळजी असते. जेव्हा मी घराबाहेर असतो तेव्हा माझ्या पत्नीला माझ्या सुरक्षिततेची काळजी असते. ११ मे रोजी माझ्या आईने माझ्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. मी कमिशनर म्हणून ज्ञानवापीला जात असल्याचे त्यांना कळले असावे. माझ्या आईनेही मला आयोगाकडे न जाण्यास मनाई केली, कारण माझ्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी सांगितले.
न्यायाधीशांची सुरक्षा वाढवली
न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी डीजीपी, अतिरिक्त प्रधान सचिव गृह आणि पोलिस आयुक्त, वाराणसी यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी सांगितले की, एसीजेएम रवी कुमार दिवाकर यांना नोंदणीकृत पोस्टवरून मिळालेल्या पत्राचा तपास डीसीपी वरुणा झोनकडे सोपवण्यात आला आहे.