राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पुढील सुनावणी १६ जूनला 

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी बुधवारी (८ जून) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ बाहेर पहारा देण्याबरोबरच राणा दाम्पत्याच्या खार येथील घराबाहेर ठिय्या धरला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची योजना रद्द केली होती.

त्यानंतर राणा दाम्पत्याला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. खार पोलिसांनी कलम १२४-अ (राजद्रोह) अंतर्गत राणा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहिताच्या कलम ३५३ (लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी बळाचा वापर) आणि ३४ (सामान्य हेतूने पुढे जाण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेले कृत्य) अंतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला ४ मे रोजी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

राणा दाम्पत्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत असल्याची नोटीस दोन दिवसांपूर्वी त्यांना देण्यात आली होती. त्यानुसार आज बुधवारी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ८५ पानांच्या आरोपपत्रात २३ साक्षीदारांचे जबाब आहेत. राणा दाम्पत्यावर सार्वजनिक सेवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.

Share