राज्यसभा निवडणूक : देशमुख, मलिकांच्या मतदानाबाबत आज फैसला

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या १० जून रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते अनिल देखमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून, यावर आज पहिल्या सत्रात निर्णय देण्यात येणार आहे.

येत्या १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी महाविकास आघाडीसह भाजपला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

Share