सभेसाठी या रे, खैरेंचा पैसे वाटतानाचा फोटो मनसेकडून व्हायरल

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा काल पार पडली. यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सभेनंतर शिवसेना नेत्यांनी सभेच्या गर्दीचे फोटो शेअर करत सभेसाठी विक्रमी गर्दी झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ही गर्दी पैसे देऊन जमविल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेने शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा एक फोटो व्हायरल केला आहे. ज्यात खैरे हे पैसे वाटताना दिसत आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी चंद्रकांत खैरे यांचा पैसे देतानाचा फोटो ट्वीट करत निशाणा साधला आहे. ‘सभेआधी चंद्रकांत खैरे हे पैसे वाटत असून सभेसाठी या रे, असा आक्रोश करत आहेत,’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिवसैनिक आक्रमक…

अमेय खोपकर यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर एकेरी शब्दांत टीका करत पैसे वाटल्याचा आरोप केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत खैरे यांचा पैसे देताना व्हायरल होत असलेला फोटो हा करोना काळात मुलगा गमावलेल्या निराधार व्यक्तीला आर्थिक मदत करतानाचा आहे, असा दावा खैरे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे, मनसे आमदार राजू पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत सभास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

Share