माझे वडील अयोध्येला गेले; पण शिवसेनेने त्यांना राजकारणातून संपवले : आ. अतुल सावे

मुंबई : माझे वडील दिवंगत खासदार मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते; पण अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. राजकारणातून त्यांना संपवले. शिवसेनेने माझ्या वडिलांना साधे लोकसभेचे तिकीट दिले नाही. काल मुख्यमंत्र्यांनी अर्धीच स्टोरी सांगितली, पूर्ण स्टोरी का सांगितली नाही? असा सवाल मोरेश्वर सावे यांचे पुत्र आणि औरंगाबाद (पूर्व) चे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला.

बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता. मी त्या ठिकाणी होतो, मी माझ्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे, असा दावा करून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (८ जून) औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेतून भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपचे औरंगाबादमधील आमदार अतुल सावे यांचे वडील दिवंगत खासदार मोरेश्वर सावे हे औरंगाबादहून अयोध्येला शिवसैनिकांसह गेले होते याची आठवण करून दिली आणि आमदार अतुल सावे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हे सांगावे, असे म्हटले. यावर आज गुरुवारी भाजप आमदार अतुल सावे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

शिवसेना नेत्यांनी मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण केले

यावेळी आमदार अतुल सावे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात माझे वडील स्व. मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. माझे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते; परंतु अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेनेने माझ्या वडिलांना साधे लोकसभेचे तिकीट दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे अयोध्येला गेल्याचे सांगितले; पण पूर्ण गोष्ट का सांगितली नाही, हा माझा सवाल आहे. मोरेश्वर सावे यांचा इतकाच अभिमान होता, तर शिवसेनेने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट का दिले नाही, लोकांनी त्यांना जी ‘धर्मवीर’ पदवी दिली होती, ती का मान्य केली नाही हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो, असे आ. अतुल सावे म्हणाले.

मोरेश्वर सावे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल का बोलत नाहीत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा आमदार अतुल सावे यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी कारसेवक म्हणून औरंगाबादहून एक रेल्वे भरून लोक गेले होते, त्यामध्ये माझे वडील गेले होते. त्यामध्ये शिवसेना असा काही विषय नव्हता. त्यावेळेस प्रखर हिंदुत्व मानणारे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भाजपसह सर्व हिंदुत्वादी संघटनांचे लोक त्या रेल्वेत अयोध्येला गेले होते. कारसेवेत सहभागी होऊन माझ्या वडिलांनी तेव्हा शिवसेनेची लाज राखली; पण अशा हिंदुत्ववादी रामभक्त खासदाराचे शिवसेनेने मात्र राजकारणात उच्चाटन केले. प्रखर हिंदुत्ववादी मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने राजकारणातून संपवले. उद्धव ठाकरे कारसेवक म्हणून मोरेश्वर सावे यांचा गौरव करतात; परंतु त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल का बोलत नाहीत? असेही आ. सावे यावेळी म्हणाले.

Share