मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत आवश्यक संख्याबळ नसतानाही ‘चाणक्य नीती’ ने भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही पाच जागा लढवत आहोत. सत्तारुढ पक्षात खूप मोठा ‘अनरेस्ट’ आहे. त्या ‘अनरेस्ट’ला कुठेतरी जागा हवी म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतोय. त्याचे काही आराखडे तयार केले आहेत. आम्हाला मोठ्या प्रमाणात आमदार मदत करतील, आम्ही पाचवी जागा जिंकणारच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात; पण राज्यसभेप्रमाणेच एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवून भाजपने विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
पाचवी जागा जिंकून आणणे सोपे नाही; पण आम्ही करून दाखवणार!
भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आमची अपेक्षा अशी होती की, सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी तसा प्रयत्नही केला. मात्र, काँग्रेसने उमेदवार मागे घ्यायला नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आज आम्ही सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेतला आहे. आम्ही पाच जागा लढवतोय. मी जास्त बोलत नसतो. आमचा प्लॅन तयार आहे. सत्तारुढ पक्षात खूप मोठा ‘अनरेस्ट’ आहे, त्याला कुठेतरी जागा हवी म्हणून आम्ही पाचवी जागा लढवत आहोत. पाचवी जागा लढवणे आणि जिंकून आणणे हे सोपे नाही; परंतु मला विश्वास आहे की, आम्ही पाचवी जागा जिंकणारच.
भाजपकडून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात कोण?
दरम्यान, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर आता भाजपचे अधिकृत पाच उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार आता विधान परिषदेची निवडणूक लढवतील.
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विधान परिषद निवडणूक प्रक्रियेत पंकजा मुंडे या दिसत नाहीत. त्या नाराज आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, देवेंद्र फडणवीस यांनी, पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, असे उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तेथे आता निवडणूकही आहे. तिथला प्रभार त्या सांभाळतात आणि आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. तुम्ही काळजी करू नका? भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवाराचे घटक आहोत, असे फडणवीस म्हणाले.