पुतळ्यावरून राजकारण तापले! मंत्री अब्दुल सत्तारांचं जलील यांना आव्हान

औरंगाबादः शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे. भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठीआग्रही आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा पुतळा उभारण्यास विरोध दर्शवला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, असा सल्ला खासदारांनी दिला आहे. यावर आता महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वक्तव्य केल आहे.

पुतळ्याचा वाद काय आहे ?
शहरातील कॅनॉट परिसरात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची योजना आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र मागील आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला. पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजपुत समाजाच्या वतीने शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शिवसेना आमदार अंबादस दानवे यांनीदेखील, ज्यांना महाराणा प्रतापांचा इतिहास ठाऊक नाही, त्यांनी याविषयी काही बोलू नये, असा इशारा दिला होता. आता मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील या वादात पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.

सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते बोलले. अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असे मी आवाहन केल आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.

Share