नागपूर : राजकीय पक्षांनी मतदान कार्डशी आधार संलग्न करण्यासाठी मतदाांना प्रोत्साहीत करण्यासाठी सहकार्य करावे. आधार संलग्न मतदान कार्ड करणे हे ऐच्छिक असून त्यामुळे एकाच मतदाराची नाव विविध मतदार संघात असल्यास ते कळेल व एकच मतदान कार्ड रहील, त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. आधार संलग्न मतदार कार्ड करणे हे महत्वाचे असून १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या मोहीमेस सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांशी आधार क्रमांकाची जोडणी तथा आगामी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादी संदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, हेमा बडे, पियुष चिवंडे, तहसीदार राहुल सारंग यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करा
मुख्य निवडणूक अधिकारी यांनी नुकताच याविषयी राज्यात त्याबाबतचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरुन तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना आधार संलग्न मतदान कार्ड करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. मतदान नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. १ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्तींचा आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करण्यात येईल. आधार जोडणीसाठी नमुना क्रमाक ६ -ब भरुन देण्यात यावा. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र ६ -ब ERO Net, GARUDA, NVDP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
११ पर्यायी कागदपत्रापैकी १ कागदपत्र हवे
मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदाराला नमुना अर्ज क्र. ६ -ब मध्ये नमूद केलेल्या ११ पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहित पेन्शन कागदपत्र, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र व सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र आदींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
घरोघरी देण्यात येणार भेटी
यासाठी पहिले विशेष शिबीर ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आता वर्षातून ४ वेळा हे शिबीर घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम घरोघरी भेट देवून राबविण्यात येणार आहे. शंभरटक्के मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून ३१ मार्च २०२३ पूर्वी नमुना अर्ज क्र. ६ -ब मध्ये आधार क्रमांक उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, मतदारांनी आधार क्रमांक उपलब्ध करुन द्यावा, हे या मोहिमेचे मूलभूत तत्व आहे. राजकीय पक्षांनी याबाबत जनतेत जनजागृती करावी. या मोहिमेस सहकार्य करावे, असे निवडणूक विभागाचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले. यावेळी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याविषयावर चर्चा केली.