शिंदे-फडणवीस सरकारचं हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का? यशोमती ठाकूर

अमरावती :  शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली. याबराेबरच राज्याच्या माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेचा समावेश नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही भारत जाेडाे आंदाेलन सुरु केले आहे. काॅंग्रेसच्या माध्यमातून हे अभियान सुरु आहे. आज महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यात एकही महिलेचा समावेश नाही याचे आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळ विस्ताराचा जोक होऊ शकतो अशी टिप्पणी देखील ठाकूर यानी केली.

याबराेबरच यशाेमती ठाकूर यांनी शिंदे फडवणीस सरकारमधील मंत्री वाशिंग पावडरने धुतले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी नवनिर्वाचित संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करुन त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने चित्रा वाघ यांची काय प्रतिक्रिया येते याची मी वाट बघत आहे असंही त्यांनी नमूद केले.

Share