बिहारमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. काहीच वेळापूर्वी नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. आता राज्यात नवीन राजकीय समीकरणं उदयास आली आहेत.

जेडीयू बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपानं नेहमी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. भाजपान जेडीयू पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाआघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात आरजेडीचे तेजस्वी यादव हे राज्यपालांच्या भेटीला पोहचणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्याच पार पडण्याची शक्यता आहे. जेडीयूच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी भाजपासोबत आघाडी तोडत असल्याची घोषणा केली.

बिहारमध्ये सत्तेच्या नव्या समीकरणानुसार जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून सरकार स्थापन करतील. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार १६० आमदारांचे (आरजेडी-७९, जेडीयू-४५, काँग्रेस-१९, ​​डावे-१६आणि अपक्ष-१) समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जाणार आहेत. तत्पूर्वी, महाआघाडीच्या सर्व पक्षांच्या आमदारांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. महाआघाडीच्या आमदारांचे आभार व्यक्त करताना तेजस्वी यादव म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

Share