पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता, ९० ई-बसेसचे लोकार्पण

पुणे :पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम २ अंतर्गत प्राप्त ९० ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ई-बसच्या वापरामुळे प्रवाशांना आरामदायी वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बसेसचे नागरिकांकडून स्वागत होईल. पुणे उद्योग आणि विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक शहर आणि एक महानगर म्हणून पुण्याचा विस्तार होत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पीएमपीएमएलची बससेवा महत्वाची ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहीत होण्यासाठी ही बससेवा महत्वाची आहे. पीएमआरडीए क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक उपयुक्त ठरली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड सोबत महानगरात समाविष्ट झालेली गावे आणि इतरही ग्रामीण भागातील गावांमध्ये पीएमपीएमएलची बससेवा पोहोचली आहे. महानगरातील वाहतूक कोंडी ही येत्या काळातील मोठी समस्या होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुविधाजनक करणे हा त्यावरचा प्रभावी उपाय ठरू शकेल. येत्या काळात ई-बससेवेचा विस्तार करण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हरित ऊर्जा महाराष्ट्रभर
केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रांनाथ पांडे म्हणाले, फेज-२अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उद्देश हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यामुळे विकसीत देश म्हणून ओळख होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी ही सुविधा महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचामृत’ संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे.

७५ हजार कोटींची गुंतवणुक
देशातील अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. ऑटो उद्योगातही यादृष्टीने सुधारणा करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. देशात कोरोना नंतरच्या काळात या क्षेत्रात ७५ हजार कोटींची नवी गुंतवणुक झाली आहे.

ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण
इलेक्ट्रीक बॅटरीच्या क्षेत्रात चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवू असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुणे शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या अॅपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल.

अतिरिक्त बोजा नाही
या बसेसनी दोन कोटी किलोमीटर वाहतूकीचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्र सरकारने फेज-2 अंतर्गत ई-बसेससाठी मोठी सबसिडी दिल्याने लोकांवर अतिरिक्त बोजा पडला नाही. येत्या काळात अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही देशातील पहिली बससेवा ठरेल. राज्यातील पूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यायी इंधनाच्या सहाय्याने चालविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Share