भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी, तुम्ही मशाल, पंजा आणि घडाळ्याची चिंता करा

नागपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी शिंदेची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी लगावला आहे. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाना पटोले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना भाजपाची तलवार चालविणे हेच शिंदे गटाचे चिन्ह अशी टीका केली आहे. यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे यांनी पटोलेंना टोला लगावला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती आहे. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लाऊ त्यापेक्षा अधिक ताकदीने युतीतील पक्षाच्या उमेदवारासाठी काम करू.मुख्यमंत्री शिंदे आणि आम्ही एक आहोत पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करावी, कमळ आणि ढाल–तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाही.

लोकशाहीच्या चौकटीत संसदीय शब्दांचा वापर करून केलेली टीका सहन करतो. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थोडी जरी टीका केली तरी त्या व्यक्तीला तुरुंगात पाठविण्याची आमची संस्कृती नाही. पण आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहे. चौकट ओलांडून कोणी टीका टिप्पणी केली तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केलं आहे. त्यांना देशातील जनतेने दोनवेळा लोकसभा निवडणुकीत बहुमत दिले आहे. त्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. पटोले यांनी आपली पातळी ओळखून बोलावे. मानसिक संतुलन ढळल्याप्रमाणे नाना पटोले हे दररोज मोदी यांच्याविरोधात बोलतात. पटोले यांनी त्यांचे वर्तन सुधारले पाहिजे. आगामी निवडणुकीत भाजपा त्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करेल अशी टीका देखील बावनकुळे यांनी केली.

Share