अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बुलढाणा : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या भागात झल्येल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने तत्काळ करावेत. यापासून एकही शेतकरी आणि त्याचे क्षेत्र वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १० ऑक्टोबर रोजी सर्वदूर पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात १०७ मिमी आणि नायगाव मंडळात १०७मिमी, तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे दोन तालुक्यातील सुमारे १९ हजार ६५ हेक्टर आर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.

या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या पंचनाम्यातून नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी आमदार संजय रायमूलकर उपस्थित होते. सद्यःस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. येत्या दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Share