पुणेकरांची करवसुली थांबवा; राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पुणे महापालिकेनं अचानक शहारातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटीसा धाडल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर ही कर वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी करणार पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे.

पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पुणेकरांना धाडल्या आहेत. १९७० च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मूल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. २०१९ ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली? तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिलेली असली तरी, यावर कायम स्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा ही मागणी मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील गोरगरीब जनतेला आणि दुर्गम भागातील जनतेच्या विविध आरोग्य तपासण्या अत्यल्प दरांत उपलब्ध करून देण्यासाठीच्या एका तंत्रज्ञानाचं सादरीकरण देखील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसोबत करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

 

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती ठरेल असे एक मशीन घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हेल्थ नोवो या कंपनीच्या हेल्थ एटीएम या रक्त चाचणी करणारी अत्याधुनिक मशीन आहे. १४० वेगवेगळ्या टेस्ट या मशीनद्वारे केल्या जातात आणि ५ ते १० मिनिटात रिझल्ट माहित पडतो अशी ही मशीन आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे हे मशीन असून हें पोर्टेबल मशीन कुठे ही घेऊन जाऊ शकतो. याचे चार्जिंग ७ ते ८ तास चालते. एक वेळी ४ टेस्ट एकदम यात करता येतात अशी मशीन असल्याने याचा मोठा फायदा गाव खेड्यात ही होईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी याची माहिती मुख्यमंत्री यांना दिली.
Share