मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संत्तारांच्या या विधाना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. मात्र, सत्तारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. महिलांचा सन्मान जपला पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे आपल्या ट्वीट म्हणतात की, ‘महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2022
‘परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया,’ असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
‘राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते,’ असं सुप्रिया सुळे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाल्या.
अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.