मुंबई : राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॅानी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू असा टोला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
संजय राऊत म्हणाले की, हे आवाज काढणं, अमूक करणं, तमूक करणं हे खूप झालं. यापलिकडे आपण आता मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलिकडे पाहा. महाराष्ट्र पाहा पूर्ण, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.
उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कुणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? कुणाचंही. मी एका पक्षाचं नाव घेत नाही. काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जे आम्ही करत आहोत. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत. तरीही आम्ही काम करत आहोत, लढत आहोत, असं त्यांनी सांगितलं. जे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला हवं होतं. अख्खा बुलढाणा त्या दिवशी रस्त्यावर उतरला होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे महाराष्ट्राने पाहिलंय, असंही ते म्हणाले.