नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. कमलनाथ यांनी पीटीआयला मुलाखत दिली.
यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी हे २०२४ मध्ये केवळ विरोधी पक्षांचा चेहराच नसतील तर ते पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. जगाच्या इतिहासात ३५०० किलोमीटरहून अधिक पदयात्रा कोणत्याही व्यक्तीने केलेली नाही. भारतासाठी गांधी कुटुंबाने जेवढा त्याग, बलिदान केले आहे, तेवढा अन्य कोणत्याही कुटुंबाने केलेला नाही, असं कमलनाथ म्हणाले.
राहुल गांधी सत्तेचे राजकारण करत नाहीत. तर ते जनतेचे आणि लोकांचे राजकारण करतात. त्यामुळे जनता आपोआप त्यांना सिंहासनावर बसवते. जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतून जात होती, तेव्हा भाजपने महाराष्ट्रात ही यात्रा अयशस्वी होईल असा प्रचार केला होता. मात्र, या यात्रेला महाराष्ट्रात अधिक पाठिंबा मिळाला. परंतु मध्य प्रदेशात आल्यानंतर या यात्रेने सर्व विक्रम मोडीत काढले, असं कमलनाथ म्हणाले.
राजस्थाननंतर दिल्लीतही राहुल गांधींची यात्रा किती लोकप्रिय होत आहे, हे सर्वांनी पाहिलंय. मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेमध्ये केवळ काँग्रेसचे कार्यकर्तेच सहभागी झाले नाहीत, तर सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. भारत तोडणाऱ्या शक्तींचा पराभव करून द्वेष संपवणे हा या यात्रेचा उद्देश आहे, असं कमलनाथ म्हणाले.