नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं आहे. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७५ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. तरीदेखील नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांनी जाण्यास टाळले. दरम्यान काल त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले जयप्रकाश छाजेड हे कामगार चळवळीत सक्रिय होते. इंटकचे ते प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षात त्यांनी शहर आणि राज्य पातळीवर अनेक संघटनात्मक पदे भूषवली आहेत. नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे.