राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आजच्या कारवाईनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी म्हटले की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. २०१९ मध्ये धाडी पडल्या होत्या. मंत्री असताना मुश्रीफ यांनी आणखी अफरातफर केली.

Share