‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड

मुंबईः प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ६९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेस्ट कंजेशन या आजारामुळे काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लहरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बप्पी लहरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांनी १९७०-८० च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लहरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९७३ साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.

भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी ३ चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.

बाप्पी लहरी यांची गाजलेली बॉलिवूड गाणी
यार बिना चैन कहा रे
याद आ रहा है तेरा प्यार
रात बाकी, बात बाकी
तम्मा तम्मा लोगे
बम्बई से आया मेरा दोस्त
ऊलाला ऊलाला (डर्टी पिक्चर)
तुने मारी एंट्रिया

 

Share