मुंबई : औरंगाबाद मध्ये काल स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर युगपुरुष, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, असे म्हंटले आहे.
युगपुरुष, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु –
१) राजमाता जिजाऊ – शिवबांना "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता..
२) राजपिता शहाजी राजे – शिवबांच्या मनात "स्वराज्य" ही संकल्पना रुजविणारे कर्तुत्ववान पिता..#ChhatrapatiShivajiMaharaj— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 28, 2022
यासंदर्भात रुपाली चाकणकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘युगपुरुष, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु – १) राजमाता जिजाऊ – शिवबांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता..२) राजपिता शहाजी राजे – शिवबांच्या मनात “स्वराज्य” ही संकल्पना रुजविणारे कर्तुत्ववान पिता..’, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले राज्यापाल ?
काल औरंगाबाद मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.