नवी दिल्ली : समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारलं असतं? असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपलं विधान त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
खासदार उदयनराजे यांनी ट्विट म्हटलं की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपची शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे. असं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 28, 2022
काय म्हणाले राज्यपाल ?
काल औरंगाबाद मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.