मराठी जनतेच्या आग्रहाचा केंद्राने मान ठेवावा अन्यथा…

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुराठा करीत आहेत. केंद्र सरकारने मराठी लोकांच्या आग्रहाचा मान ठेवावा. अन्यथा उद्रेक होऊ  शकतो असा इशारा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे.

मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, मराठी गौरव दिनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा अशी सर्वाची अपेक्षा होती. सर्व प्रयत्न करण्यात आले. केंद्र सरकारने सकारात्मकता दाखविली, परंतू अद्याप त्याची घोषणा केली नाही. मागील दोन वर्षापासून केंद्राकडे आणि पंतप्रतधानांकडे पाठपुरावा करुन पत्रव्यवहार केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची देखील भेट घेतली परंतू अद्याप त्याचा निर्णय होत नाही. सर्व महाराष्ट्राला या निर्णयाची प्रतिक्षा आहे. यासाठी अभियान चालवले, लोकजागृती केली.  राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठवले. परंतू अद्याप केंद्राने ही घोषणा केली नाही. याबद्दल मंत्री  देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

मागील वर्षी मराठी भाषा दिनी दोन सूचना केल्या होत्या. त्यातील पुस्तकांचे गाव ही योजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याची सूचना होती, त्यानुसार श्रीरामपूर, विदर्भातील नवेगाव, बुलढाणा, वेरूळ, सिंधुदुर्ग येथील पोंभुर्णे या पाच गावांमध्ये पुस्तकाचे गाव साकारेल तर उर्वरित जिल्ह्यात पुढे ही चळवळ सुरू होईल.  राज्य शासनात जे शब्द वापरले जातात, ते सुलभ करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती, ही दुसरी सूचना होती, त्यानुसार लवकरच सुलभ शब्दांचा कोश सादर करून राज्य व्यवहारात मराठीचा वापर केला जाईल, असेही मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

Share