मुंबईः बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा विषय त्यांनी आज विधानसभेत मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर भाष्य करत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील
अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्यात कुठलाही पुतळा बसवता येत नाही, हा राज्याचा नियम असून तो सगळीकडे पाळला जातो. या पुतळ्याची उंची इतकी लहान होती की, रस्त्यावर चालता चालता त्या पुतळ्याला कुणाचाही हात लागू शकत होता. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नियमाप्रमाणे पुतळा हटवला. त्यासाठी त्यांनी पोलिस संरक्षण मागितले होते. आयुक्तांनी नियमांप्रमाणे त्यांच्या अधिकारात कारवाई केली, असे दिलीप वळसे म्हणाले.
ज्यादिवशी मनपा आयुक्तांवर शाई टाकण्यात आली, त्यादिवशी अमरावतीमध्ये असे वातावरण निर्माण झाले होते की, पोलिसांना कठोर कारवाई करण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. तरीही आमदार रवी राणा त्यादिवशी दिल्लीत असताना त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला असेल तर कोणत्या परिस्थितीत दाखल झाला, याची चौकशी करावी लागेल. या संदर्भात कुठलीही कृती करण्यासाठी मी किंवा उद्धव ठाकरे यांनी कोणतेही निर्देश दिले नव्हते, जेव्हा राज्यातील एखाद्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो, परिस्थिती स्फोटक होते, तेव्हाच मुख्यमंत्री वा मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, तसेच सभासदांच्या भावना लक्षात घेऊन अतिरिक्त महासंचालक, कायदा व सुव्यवस्था यांच्याकडून याप्रकरणाची चौकशी करुन, त्यांच्या अहवालावर विरोधी पक्षनेते यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका दिलीप वळसे पाटील यांनी मांडली.