मुंबई : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण मुंबई बॅँकेची निवडणूक लढवताना मजूर असल्याचं दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल रद्द करण्यात यावा ही दरेकरांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांना मोठा झटका बसला आहे.
प्रविण दरेकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी दरेकर यांच्या वकिलांनी दरेकरांना अटकेपासून संरक्षण मिळावं. त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी केली. त्यावर कोर्टाने त्यांना रितसर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी प्रचंड युक्तीवाद केला. संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे झालेला नाही. त्यामुळे दरेकरांना लगेच अटकपूर्व जामीन मिळणं योग्य ठरणार नाही, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.