आमदरांना घर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील

मुंबई : राज्यातील जवळपास ३०० आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने काल जाहीर केला. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं या निर्णयावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा केली. ही घरे सर्वपक्षीय आमदारांना देण्यात येणार आहेत. मात्र, याच निर्णयाला मनसेने विरोध केलाय. एकीकडे एसटी कामगारांचा, कोविड भत्ते, शेतकरी, नोकर भरती यासाठी सरकारकडे पैसे नाही. असे असताना आमदारांना फुकट घर का ? असा सवाल मनसेनं केलाय.

यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची घोषणा काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत ३००  घरे देणार असल्याचं जाहीर केलं. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

Share