मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीला मारणार दांडी?

मुंबईः जगासह देशातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दांडी मारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता उद्धव ठाकरे या बैठकीला दांडी मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बरेच दिवस घरातून बाहेर पडलेले नाहीत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्या कोणत्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणी भाजप नेते करत आहेत. मात्र, महाविकासआघाडीचे नेते वारंवार उद्धव ठाकरे यांची प्रकृती व्यवस्थित असून ते कामही करत असल्याचे सांगत आहेत. मात्र, आता उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्यास विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळू शकते.

Share